राज्यात एकाच दिवशी शिवजयंती साजरी करण्याची मागणी

कोल्हापूर : राज्यात दोन वेगवेगळ्या तारखांना शिवजयंती साजरी न करता ती एकाच दिवशी साजरी करण्यात यावी अशी मागणी आता शिवसेना आमदारांनी ठाकरे सरकारकडे केली आहे.

तिथीनुसार शिवजयंती साजरी न करता ती तारखेनुसारच साजरी केली जावी अशी भूमिका शिवसेना आमदार अंबादास दानवे आणि संजय शिरसाट यांनी मांडली आहे. तारखेनुसार १९ फेब्रुवारी या दिवशीच एकदाच शिवजयंती साजरी करण्यात यावी अशी मागणी सरकारकडे करणार असल्याची माहिती शिवसेना आमदारांनी दिली आहे.“दरवेळी शिवजयंती साजरी होताना काही पक्षांची आणि शिवप्रेमी संघटनांची मागणी होती की शिवजयंती एकाच दिवशी साजरी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात जल्लोष करता येतो. पण दोनदा साजरी केल्यामुळे त्यामध्ये अडथळे येतात. कोणताही एक दिवस हा सरकारने निश्चित केला पाहिजे. दोन शिवजयंती या महाराष्ट्रात नको ही आम्ही सर्वांची भूमिका आहे आणि ही मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत,” अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी दिली.