सातारा: एसटी कर्मचाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे प्रवाशांचे हाल होत असतानाच बहुतांश कर्मचारी कामावर हजर झाल्याने एसटीची प्रवासी वाहतूक पूर्वपदावर येताना दिसत आहे.
सातारा बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने गजबजून गेले होते. महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या होत्या. त्यामुळे विभागीय कार्यालय व कार्यशाळेत हळूहळू कर्मचारी कामावर हजर झाले. सध्या सातारा विभागातील सर्वच आगारांतून एसटीच्या लांब पल्ल्याच्या मार्गासह ग्रामीण फेऱ्या सुरू झाल्या आहेत. या बसेसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सातारा बसस्थानकात शुकशुकाट जाणवत होता. मात्र, रविवारी सातारा बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने गजबजून गेले होते. एसटीकडे प्रवाशांची संख्या आता हळूहळू वाढू लागली आहे. विविध मार्गांवर प्रवासी उपलब्ध होतील, त्याप्रमाणे विविध आगारांतून बसेस सोडण्यात येत आहेत.