म्हाडाच्या परीक्षार्थींना परीक्षा शुल्क परताव्याची प्रतीक्षा

मुंबई : म्हाडाच्या भरती परीक्षेतील सर्व परीक्षार्थीना परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पण, भरती परीक्षा पार पडल्या तरीही अडीच लाखांहून अधिक परीक्षार्थीना परीक्षा शुल्क परताव्याची प्रतीक्षा आहे. 

पुणे सायबर पोलिसांनी पेपरफुटीचा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर डिसेंबरमध्ये परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्याचवेळी परीक्षा शुल्क परत करण्याची घोषणाही करण्यात आली. सरकारच्या निर्देशानुसार म्हाडाने ऑनलाइन परीक्षा घेतली, पण परीक्षा शुल्क अद्याप परत केलेले नाही.म्हाडाने प्रत्येकी ५०० रुपये परीक्षा शुल्क आकारले होते.

अडीच लाखांहून अधिक परीक्षार्थी  होते. त्यातून म्हाडाकडे कोटय़वधी रुपये जमा झाले होते. पण ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याचा त्रास परीक्षार्थीना सहन करावा लागला. त्यामुळे भरपाई म्हणून परीक्षा शुल्क परत करण्याची घोषणा करण्यात आली आणि घोषणेची अंमलबजावणी त्वरित करण्याचे जाहीर करण्यात आले. परीक्षा पार पडल्या तरी शुल्कपरतावा झाला नसल्याची माहिती एमपीएससी समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी दिली.  शुल्क लवकर परत करावे, तसेच उत्तरतालिकेसंबंधीचे आक्षेप नोंदविण्यासाठी आकारण्यात येत असलेले २०० रुपये शुल्कही रद्द करावे, अशी मागणीही त्यांनी केली.