काेल्हापूरच्या फुटबाॅलच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रेक्षकांविना हाेणार सामना

कोल्हापूर : काेविड १९ च्या संसर्गामुळे गेल्या दोन वर्षापासून स्थगित ठेवण्यात आलेल्या महापौर करंडक फुटबॉल स्पर्धेतील राहिलेले सामने उद्यापासून घेण्यात येणार आहे.या निर्णयामुळे खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. परंतु फुटबाॅलप्रेमींत नाराजीचा सूर पसरला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हे सामने सुरु असताना शाहू स्टेडियमध्ये प्रेक्षकांना एंट्री नसणार आहे.

कोल्हापूर आणि फुटबॉल हे एक अतूट नातं आहे. या नात्यात यंदा काेराेनाने प्रेक्षकांची मात्र ताटातूट केली आहे. यंदा प्रथमच फुटबाॅलप्रेमींविना खेळाडूंना सामना खेळावा लागणार आहे. त्यामुळे ना टाळ्या, शिट्यांचा गजर अशा वातावरणात खेळाडूंना देखील सामने खेळताना जड जाणार हे निश्चित. दरम्यान प्रेक्षकांना सामना पाहता यावा यासाठी त्याचे युट्यूबवर थेट प्रक्षेपण करण्याचं नियाेजन संयाेजकांनी केले आहे. काेल्हापूरच्या फुटबाॅलच्या इतिहासात कधी नव्हे ते प्रेक्षकांविना सामना हाेणार असल्याने त्याची देखील नाेंद हाेईल अशी शक्यता आहे