संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खा. धैर्यशील माने यांची जोरदार मांडणी

कोल्हापूर : दिल्ली येथे सुरु असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी अर्थसंकल्पावर जोरदार मांडणी केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील प्रमुख मुद्यांची प्रभावीपणे मांडणी करीत सभागृहाचे लक्ष वेधले.

जीएसटी, वस्त्रोद्योग, शेतकर्‍यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.महाराष्ट्राची बाजू मांडताना ते म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. चक्रीवादळ, महापूर अशा आस्मानी संकटातही राज्यातील एक कोटी करदात्यांनी कररुपाने केंद्राला पैसे दिलेले आहेत. केंद्राच्या 2 लाख 20 हजार कोटी जीएसटीपैकी केवळ एका महाराष्ट्राने 48 हजार कोटी रुपये केंद्राच्या तिजोरीत दिलेले आहेत. असे असतानाही संकटाच्या काळात मात्र मदत देताना हात आखडला जातो आहे.हा दुजाभाव कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र राज्याचा जीएसटीचा पंचवीस हजार कोटींचा परतावा अद्याप दिलेला नाही. तो मिळाला पाहिजे. असा दुजाभाव करू नये, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.महाराष्ट्रामध्ये वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे त्याला सरकारच्या मदतीची गरज आहे. मागील बजेटमध्ये राज्यांमध्ये सात मेगा टेक्स्टाइल पार्कची घोषणा केली होती त्यामधील एक मेगा टेक्स्टाइल पार्क महाराष्ट्र मध्ये व्हावी अशी मागणी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे खासदार धैर्यशील माने यांनी केली .

केंद्र सरकार दोन कोटी रोजगार देणार होते. परंतु तीन कोटी बेरोजगार झाले याकडे लक्ष वेधत धैर्यशील माने यांनी वस्त्रोद्योगामध्ये रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत याकडे लक्ष वेधले. कोरोनाच्या काळात शेतकर्‍यांनीच अर्थव्यवस्था सांभाळली होती. परंतु अर्थसंकल्पात या घटकाकडे अजिबात लक्ष दिलेले नाही. एकीकडे ड्रोनद्वारे आधुनिक शेती करण्याकडे केंद्र सरकार प्रोत्साहित करत आहे परंतु सध्या महाराष्ट्रासह देशामध्ये खतांचे दर वाढल्यामुळे शेतकर्यांना शेती करणे मुश्कील झाले आहे याकडे सभागृहाचे लक्ष वेधून यासाठी बजेटमध्ये तरतूद करावी तसेच बरीच वर्षे शेतकर्‍यांची एसएमपी ची मागणी आहे त्यावर केंद्र सरकारने या बजेटमध्ये काहीही उल्लेख केलेला नाही शेतकऱ्यांच्या एसएमपी चा निर्णय त्वरित व्हावा अशी मागणी निर्मला सीतारामन यांच्याकडे केली. पुरवणी अर्थसंकल्पात या बाबींचा गांभीर्याने विचार व्हावा अशी मागणी त्यांनी केली.खासदार माने चांगली मांडणी करीत आहेत : सभापती ओम बिर्लामाने यांचे भाषण सुरू असतानाच संसद सदस्य आपापसात बोलू लागल्याने सभापती ओम बिर्ला यांनी त्या सदस्यांना सुनावले. खासदार माने अर्थसंकल्पावरती चांगली मांडणी करत आहेत. त्यांच्या बोलण्यात व्यत्यय निर्माण करू नका अशा शब्दात समज दिल्यानंतर सभागृहात शांतता पसरली आणि तब्बल 14 मिनिटे माने यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली.