अजिंठा वेरूळ लेण्यांसमोरील जैन कीर्ती स्तंभ हटवण्याची मागणी

औरंगाबाद: भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा वेरुळ लेण्यांच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर उभारलेला भगवान महावीरांच्या शिकवणीचे प्रतिनिधित्व करणारा जैन कीर्ती स्तंभ हटवण्याची किंवा स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे.

ही मागणी मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा जैन समाजाने दिला आहे. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.औरंगाबाद परिमंडळाच्या एएसआयने अनेक कारणे सांगून जैन कीर्ती स्तंभ हटवण्याची किंवा स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. वेरुळ येथील लेणी देशातील तीन धर्मांचे (हिंदू, जैन आणि बौद्ध धर्म) प्रतिनिधित्व करतात, तर स्तंभ त्यापैकी फक्त एकाचे प्रतिनिधित्व करतो. जागेवरील फेरीवाले आणि अतिक्रमणांमुळे रहदारीमध्ये अडथळा निर्माण होतो आणि स्तंभ मुख्य प्रवेशद्वारावर असल्याने अडथळा येत आहे. ज्या जागेवर हा स्तंभ उभारण्यात आला आहे, त्या जागेचे सर्वेक्षण करण्यात आले असून परवानगी न घेता याची उभारण्यात आली आहे, असे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने म्हटले आहे.