लायसन्सशिवाय वाहन चालवणाऱ्यांना आता ५००० दंड

पुणे : केंद्रीय सुधारित मोटारवाहन कायद्यामध्ये वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दंड आकारणी केली जात आहे. विनापरवाना (लायसन्स) वाहत चालविणाऱ्यांकडून पाच हजार रुपये दंड वसूल होत आहे. २४२ जणांना गेल्या महिन्यात प्रत्येकी ५ हजार रुपये दंड आकारणी केली असून, त्यांच्यावर ११ लाख ३० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. प्रथमच विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांकडून इतका मोठा दंड आकारण्यात आला आहे.

केंद्रीय मोटार वाहन कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आल्यानंतर डिसेंबर महिन्यात महाराष्ट्र शासनाने या कायद्याला मान्यता दिली होती. त्यानंतर जानेवारीमध्ये या नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. सुधारित केंद्रीय मोटारवाहन कायद्यानुसार विनालायसन्स वाहन चालविणे हा गंभीर गुन्हा मानण्यात आला आहे. पूर्वी त्याला ५०० रुपये दंड होता. तो आता ५ हजार रुपये करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात अशा २४२ विनालायसन्स वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातील १६ जणांनी प्रत्येकी ५ हजार रुपये असा एकूण ८० हजार रुपये दंड भरला आहे. इतर २२६ जणांनी वेगवेगळी कारणे सांगून दंड भरण्यास त्यावेळी नकार दिला. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून पावती देण्यात आली आहे.