पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राविषयी तसंच काँग्रेसविषयी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद आता राज्याच्या राजकारणात उमटू लागले आहेत.
महाराष्ट्रातून अनेक मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवल्याने करोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला, अशा आशयाचं विधान पंतप्रधान मोदी यांनी केलं होतं. याविरोधात आता महाराष्ट्र काँग्रेस आक्रमक झाली असून आज आंदोलन करण्यात येत आहे.मुंबईमध्ये मंत्रालयासमोर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी माफी मागितल्याशिवाय आपण आंदोलन मागे घेणार नसल्याचंही पटोले यांनी सांगितलं आहे. तसंच राज्यभरातल्या भाजपा कार्यालयासमोर काँग्रेस आंदोलन करणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं.
यावेळी माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, “महाराष्ट्र हे देशात करोना वाढवणारं राज्य आहे. ज्या राज्याने इथल्या जनतेने मदत करण्याचं काम केलं, त्या जनतेचा अवमान करण्याचा अधिकार मोदींना नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान जनता आता सहन करणार नाही. जोवर मोदी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील. प्रत्येक जिल्ह्यात भाजपा कार्यालयासमोर काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे”.