१५ मार्चपर्यंत करोनाची तिसरी लाट ओसरेल?

जालना : करोनाची रुग्णसंख्या कमी होत असून अशीच परिस्थिती राहिल्यास मार्चच्या मध्यापर्यंत म्हणजे १५ मार्चपर्यंत तिसरी लाट ओसरेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

करोनाच्या तिसऱ्या लाटेत मोठी रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉन या नवीन विषाणूचा वेगाने झालेला प्रसार रोखण्याचे मोठे आव्हान होते. रुग्णसंख्या वेगाने वाढल्याने रुग्णशय्या, प्राणवायू व अन्य आरोग्य सुविधांची कमतरता जाणवेल का, अशी भीती होती. पण बहुतांश रुग्ण गृहविलगीकरणातच उपचार घेऊन बरे झाले आणि सुमारे ८० टक्के करोना रुग्णशय्या रिक्तच राहिल्या. आता राज्यातील करोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत होत आहेत.

राज्यातल्या करोना रुग्णसंख्येचा आलेख आता उतरणीला लागल्याचे दिसून येत आहे. मुंबई, पुणे, रायगड सारख्या रुग्णसंख्येचा उच्चांक गाठलेल्या भागातली रुग्णसंख्याही कमी होत आहे. त्यामुळे निर्बंध कमी करण्याकडे शासनाचा कल असून ते टप्प्या-टप्प्याने कमी होत आहेत. दर आठवडय़ाला ते आणखी शिथील होत जातील. मार्चच्या मध्यापर्यंत आपण तिसऱ्या लाटेच्या शेवटाकडे जाऊ, असे तज्ञांच्या मतावरून वाटत आहे, असे टोपे यांनी सांगितले.