दर्शन व्यवस्था क्षमतेत वाढ केल्याने महालक्ष्मी मंदिर गजबजले

कोल्हापूर : करवीर निवासिनी महालक्ष्मी, दख्खनचा राजा जोतिबा देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मंगळवारी दुपटीने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महालक्ष्मी मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या दुप्पट झाल्याने मंदिर परिसर गजबजला होता.

ई-पास सुविधेचा भाविकांना लाभ होत आहे. करोना रुग्ण वाढल्यामुळे महालक्ष्मी, ज्योतिबा मंदिरातील दर्शन व्यवस्था क्षमता कमी करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून प्रतितास ४०० भाविकांना दर्शनासाठी सोडले जात होते. त्यामध्ये आज बदल केला आहे. आता प्रति तास ८०० भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत. त्यामुळे दोन्ही मंदिरातील भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. भाविकांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.‘ई-पास’ सुविधादेवस्थान समितीच्या वतीने मंदिर परिसरात ई-पास सुविधा उपलब्ध केली असल्याने त्याचा भाविकांना लाभ होत आहे, असे सचिव नायकवडी यांनी पत्रकारांना सांगितले. तर काही ऐनवेळी पोचल्यावर ई-पास मुळे अडचण झाली होती. मात्र ही सुविधा लवकर उपलब्ध झाल्याने दर्शन सुलभ झाल्याचे भाविकांनी नमूद केले.