मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर घाऊक व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आता एपीएमसी प्रशासन कारवाई करणार आहे. यासाठी समिती नियुक्त करण्यात आली असून, ही समिती प्रतिमाह एपीएमसी प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईचा आढावा घेणार आहे.
राज्य सरकारकडून पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत असणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब पाटलांसह एकूण सात लोकांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. संबंधित समिती एपीएमसीमार्फत परिसरातील कोल्ड स्टोरेज वेअर हाऊस आणि मुंबईसह परिसरात सुरु असलेला बेकायदेशीर उपबाजारांवर कारवाई करणार आहे. त्याबाबतचा आढावा आता दर महिन्याला गठीत केलेली समिती घेणार आहे. नवी मुंबई परिसरात इराणी सफरचंद अफगाणिस्तानमार्फत आणून इराणी आणि अफगाणिस्तानी व्यापारी कोल्ड स्टोरेजमधून बेकायदा व्यवसाय करत होते. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. असे व्यवसाय नियमनमुक्ती झाल्यापासून फोफावला असल्याचे व्यापारी सांगत आहेत.