अनुकंपा भरती प्रक्रियेमध्ये आरोग्य विभागाची चालढकल ; माहिती देण्यास टाळाटाळ

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या विविध विभागामध्ये अनुकंपा तत्वावर पदभरतीची प्रक्रिया सुरु आहे. पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष जिल्हा परिषदेत बोलावून कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.

या भरतीसाठी सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागातील रिक्त पदांची माहिती घेतली आहे. पण आरोग्य विभागाकडून रिक्त पदांची माहिती देण्यात टाळाटाळ झालेने भरती प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झाला आहे.

सीईओ संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई आणि त्या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ही प्रक्रिया पारदर्शीपणे करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये 87 पदांची भरती केली जाणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात संबंधितांना नेमणुकीचे आदेश दिले जाणार आहेत. ज्येष्ठता यादीनुसार 21 ते 30 जानेवारी या कालावधीत पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी मुदत दिली आहे. त्यानुसार पडताळणीची प्रक्रिया जवळपास पुर्ण होत आली आहे. उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, अनुकंपा ज्येष्ठता, जात प्रमाणपत्र आणि उपलब्ध जागा पाहून कोणत्या उमेदवाराला कोठे नियुक्ती द्यायची हे निश्चित केले जाणार आहे. दरम्यान आज (शुक्रवारी) भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना एक निवेदन दिले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की जिल्हा आरोग्य विभागामध्ये रिक्त पदांची संख्या सर्वाधिक आहे. पण सदरची भरती प्रक्रिया आरोग्य विभागाकडून केली जाणार असल्याचे स्पष्ट करून रिक्त पदांची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. हे प्रकरण गंभीर असून आपण स्वतः यामध्ये लक्ष घालून मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन भोजे यांनी सीईओ चव्हाण यांना दिले आहे.