जिल्हा परिषदेच्या कामकाजाची राज्य समितीकडून पडताळणी

कोल्हापूर : पंडीत दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2022 अंतर्गत, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कामकाजाची राज्यस्तरीय समितीने आज (गुरुवारी) पडताळणी केली.

केंद्र सरकारच्या या पुरस्कारासाठी कोल्हापूर, नागपूर आणि बुलढाणा या तीन जिल्हा परिषदामध्ये सदर पुरस्कार प्राप्त करण्यासाठी कामकाजात शर्तीचे प्रयत्न झाले आहेत. सदर जिल्हा परिषदेच्या कामकाजाची माहिती आणि पहाणी करून राज्यस्तरीय समिती आपला अहवाल केंद्राकडे सादर करणार आहे. २०२०-२१ मधील कामकाजावर आधारित पंचायत सशक्तीकरण पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत.

यासाठी राज्य पातळीवरून मुल्यांकन होवून त्याचा अहवाल पुरस्कारासाठी केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदने आपला प्रस्ताव ऑन लाईन पाठवायचा होता तो जिल्हा परिषदेने प्रस्ताव पाठवला आहे. राज्यात कोल्हापूर, नागपूर आणि बुलढाणा या तीन जिल्हा परिषदामध्ये चुरस निर्माण झाली आहे. त्यानुसार पंचायत सशक्तीकरण पुरस्कारसाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाची पडताळणी केली.

या वेळी तपासणी समितीस खाते प्रमुख आणि कर्मचाऱ्यानी मुद्दे निहाय माहिती आणि अभिलेख दाखवून सहकार्य केले. राज्यस्तरीय समिती आपला अहवाल केंद्राकडे लवकरच सादर करणार आहे.