राजे बँकेतर्फे ‘मेक इन कोल्हापूर’ उपक्रमाचा रविवारी शुभारंभ

कागल: राजे बँकेच्या माध्यमातून बहूजन समाजातील युवकांना व्यवसायाच्या संधी व व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘मेक इन कोल्हापूर ‘ या उपक्रमाचा शुभारंभ शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते रविवारी 30 जानेवारी रोजी होणार आहे.

याबाबतची माहिती राजे बँकेच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहेप्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे या कार्यक्रमास शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे व या उपक्रमात सहभागी असलेले स्थानिक उद्योजक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.तसेच, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके हे युवकांना पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुल येथे सायंकाळी पाच वाजता या कार्यक्रमास सुरवात होईल तरी युवकांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ‘मेक इन इंडिया’ संकल्पना राबवून उद्योग व्यवसायास चालना दिली. याच संकल्पनेचा आदर्श घेत स्थानिक छोट्या युवकांना मोठे उद्योजक बनविण्यासाठी,बहूजन समाजातील बारा बलुतेदार, अठरा पगड जातीच्या समाजातील होतकरू युवकांना व्यवसायाचे एक व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मेक इन कोल्हापूर’ही संकल्पना तयार करण्यात आली आहे. ज्यात कोल्हापूर शहरासोबत छोट्या शहरातील व ग्रामीण भागातील व्यावसायिकांना कोल्हापूरच्याच नामांकित ब्रँड्स बरोबर काम करण्याची संधी उपलब्ध करून देणे, त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे, त्यांना माफक दरात आर्थिक साहाय्य पुरवणे, अशा विविध सुविधा एकाच छताखाली देणार आहोत. जेणेकरून आंतरराष्ट्रीय ब्रँडना हे स्थानिक ब्रँड सक्षम पर्याय ठरतील.

तरूणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करून स्वावलंबी व्हावे व इतरांना रोजगार द्यावा,हा याचा उद्देश आहे. कोल्हापूरच्या मातीत छोट्या स्वरूपात उद्योग व्यवसायाची सुरुवात करून आज नावारूपास आलेले शाहू दूध,कागल बाजार,सलगर चहा,दत्त भेळ, व्हॅलेंटिना आईस्क्रीम, हेवन पिझ्झा,आपला वडा, एस. एस. कम्युनिकेशन. हिंदुस्तान फुड्स, लाडाची कुल्फी या उद्योगांचे उद्योजक या उपक्रमामध्ये सहभागी झाले आहेत.शाहू ग्रुप ,राजे बँक व उद्योजकांमध्ये घाटगे यांच्या पुढाकारातून याबाबतचा सामंजस्य करारही झाला आहे.