एसटी संपामुळे सुटीच्या काळात प्रवाशांचे हाल

कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मिटलेला नाही. एसटी प्रशासनाकडून कारवाईचा धडका सुरू आहे. अद्यापि ५५ टक्के कर्मचारी संपात सहभागी आहेत. राज्यातील केवळ ४५ टक्के प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे सुटीच्या काळात प्रवाशांची कोंडी झाली असून हाल सुरू आहेत.

संपकाळात एसटीला १२०० कोटींचा तोटा झाला. यापूर्वी १४०० कोटी रुपयांचा संचित तोटा आहे. यातच वेतनवाढ दिल्याने वर्षाला सहाशे कोटींचा बोजा वाढला. संपादरम्यान ५ हजार ५५५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. १९ हजार २४ कर्मचारी निलंबित आहेत. अद्यापि जवळपास ४० हजारांवर कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. कोल्हापूरमध्ये ११४ बडतर्फ, तर ३५० निलंबित आहेत. एसटी चालवणे मुश्कील झाले असून संप ताणल्याने प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे.

तांत्रिक कर्मचाऱ्यांना तसेच वाहतूक सेवेतील कर्मचाऱ्यांना तसेच निवृत्त चालकांनाही चालक-वाहक म्हणून नियुक्त्या देत प्रवाशी वाहतूक सुरू ठेवण्याचा प्रयत्न आहे.