पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी महापालिकेला कारणे दाखवा नोटीस

कोल्हापूर : शहरातील नाल्यांचे सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस पाठवली. यात नदीत सांडपाणी मिसळत असल्याचे सांगितले असून, याबाबत १४ दिवसांत खुलासा करावा. असे निर्देश देण्यात आले आहेत.

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यालाही याबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. पंचगंगा नदीपात्रात राजाराम बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात मासे मेले होते. प्रजासत्ताक संस्थेने याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर नदीकाठाने पाहणी केली. यात सहा नाले वेगवेगळ्या ठिकाणी थेट नदीत मिसळत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत महापालिकेला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. कारणे दाखवा नोटीसमध्ये सांडपाणी मिसळत असल्याचा ठपका महापालिकेवर ठेवण्यात आला आहे. पाहणीत पंचगंगा घाट, दुधाळी नाला, जामदार नाला, सीपीआर नाला, कसबा बावडा नाला, शुगर मिल नाल्यातील सांडपाणी (प्रक्रिया न केलेले) थेट नदीत मिसळते, तसेच या पाण्यात शहरी घनकचऱ्याचे घटकही आढळून आले आहेत. हे प्रदूषण नियंत्रण कायद्याचे उल्लंघन आहे. याबाबत १४ दिवसांत खुलासा करावा, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.