इचलकरंजी/ मन्सूर अत्तार : १ तारखेपासून यंत्रमाग कामारांच्या मजूरीमध्ये ५२ पिकास प्रती मीटर ७ पैशांची वाढ मा.सहाय्यक कामगार आयुक्त यांनी घोषीत केलेली आहे. या घोषीत केलेल्या मजूरी वाढीस आम्ही यापूर्वीच विरोध केला असतानासुद्धा एकतर्फी वाढ घोषीत केलेली आहे. त्यामुळे हि घोषीत केलेली मजुरी कारखानदारांनी देऊ नये असे आवाहन दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने केले आहे.
सन २०१३ मध्ये यंत्रमागधारक संघटना व कामगार संघटनांमध्ये दरवर्षी महागाई भत्यास अनुसरून मजूरी वाढ करणेचा करार झाला होता. परंतू यंत्रमाग उद्योगातील भयानक मंदी, राज्य व केंद्र सरकारचे असलेले अक्षम्य दुर्लक्ष, आयात – निर्यातीचे धोरण, सुताच्या दरासंदर्भातील धोरण, सुट्या भागांची दरवाढ, वीजेच्या दरामध्ये झालेली भरमसाठ वाढ या कारणांमुळे अडचणीत असलेल्या या उद्योगास दरवर्षी मजूरीवाढ देणे अशक्य बनल्याने तसेच ट्रेडिंग असोसिएशन खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना गेल्या ८ वर्षात कोणतीही मजूरीमध्ये वाढ न केल्यामुळे गेल्या ४ वर्षांपासून यंत्रमाधारक संघटना या करारातून बाहेर पडलेल्या आहेत. तसा ठराव यंत्रमागधारकांच्या मेळाव्यामध्ये होऊन या ठरावाची प्रत मा.सहाय्यक कामगार आयुक्त यांना त्यावेळी दिलेली आहे. त्याचबरोबर गेल्या ४ वर्षांमध्ये वेळोवेळी घोषणा झालेली मजूरी वाढीची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. यावेळीसुद्धा कामगार संघटनांनी मजूरीवाढ मागीतल्यानंतर इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने मा.अतिरिक्त कामगार आयुक्त, पूणे व मा.सहाय्यक कामगार आयुक्त, इचलकरंजी यांना प्रत्यक्ष भेटून उद्योगाविषयी सविस्तर माहिती देऊन यंत्रमाग उद्योगाची परिस्थिती अत्यंत गंभीर अशी आहे.
त्यामुळे यावर्षीसुद्धा मजूरीवाढीची घोषणा करू नये. याची अंमलबजावणी यंत्रमाधारकांकडून होऊ शकणार नाही. अशा आशयाचे निवेदन दिले होते. आणि या संदर्भात सविस्तर चर्चाही केली होती. असे असताना एकतर्फी मजूरीवाढ घोषीत केलेली आहे. ही मजूरीवाढ इचलकरंजी शहर व परिसरातील यंत्रमागधारक देऊ शकणार नाहीत. आधीच अडचणीत असलेला हा उद्योग विविध कारणाने जास्तच अडचणीत येऊन यंत्रमाग बंद पडून यंत्रमागाची संख्याही कमी झालेली आहे. त्याचबरोबर फक्त इचलकरंजी केंद्रामध्ये दरवर्षी मजूरीवाढ घोषीत केल्यामुळे येथील उत्पादन खर्च इतर केंद्रापेक्षा प्रचंड वाढल्यामुळे इचलरकंजीतील कापडास बाहेरील बाजारपेठेतून मागणी येणे कमी झालेले आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून येथील उद्योग चालू ठेवणे मुशकील झालेले आहे. अशा परिस्थितीत मजूरीवाढ देणे अशक्य आहे आणि ते देऊ शकणार नाहीत असे पत्रक दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी प्रसिद्धीस दिलेले आहे.