10 लाख रुपये स्विकारताना स्थानिक गुन्हे अन्वेषणचे दोघे पोलीस जेरबंद

कोल्हापूर : स्क्रॅप वाहन जप्त करुन त्याआधारे खोटा गुन्हा दाखल करुन मोकाच्या गुह्यात अडकवण्याची धमकी देवून 25 लाखांच्या लाचेची मागणी करुन 10 लाख रुपये स्विकारणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय केरबा कारंडे (वय 50 रा. उंचगांव ता. करवीर), पोलीस नाईक किरण धोंडिराम गावडे (वय 37 रा. केदारनगर, मोरेवाडी, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. शुक्रवारी दुपारी पोलीस मुख्यालयाच्या शेजारीच ही कारवाई करण्यात आली. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली.याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे व्यवसायाने वकील असून त्यांच्या मुलग्याचा वाहन विक्री दुरुस्ती व स्क्रॅप करण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी पनवेल येथून एक स्पोर्ट्स बाईक खरेदी केली होती. ती बाई स्क्रॅप करण्यासाठी कोल्हापूरात आणली होती. याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय कारंडे, पोलीस नाईक किरण गावडे यांना मिळाली होती. या दोघांनी फिर्यादी यांच्या मुलास मंगळवार (18 जानेवारी) रोजी पोलीस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात बोलावून घेतले. तसेच त्याची गाडीही ताब्यात घेतली. तु चोरीच्या 50 हून अधिक दुचाकी विकल्या आहेस. तुझ्यावर गुन्हा दाखल करतो तसेच मोका अंतर्गत कारवाई करतो अशी धमकी या दोघांनी फिर्यादीच्या मुलास दिली. दिवसभर मुख्यालयात थांबवून घेवून सायंकाळी उशिरा त्याला घरी सोडले. यानंतर त्याला दुसऱ्या दिवशीही बुधवारी त्याला पोलीस मुख्यालयात बोलावून घेतले. तुला मोकातून सोडवायचे असेल तसेच हे प्रकरण याच ठिकाणी मिटवायचे असेल तर एकरकमी 25 लाख रुपये दे अशी मागणी केली. यानंतर रात्री उशिरा त्याला घरी सोडले. फिर्यादीच्या मुलाने ही बाब वकील असणाऱ्या वडीलांना सांगितली. यानंतर गुरुवारी सकाळी विजय कारंडे व किरण गावडे यांनी फिर्यादीच्या मुलास फोन केला. 10 लाख रुपये आजच्या आज आणून दे असे सांगितले. तसेच रक्कम घेवून पोलीस मैदान येथील अलंकार हॉल येथे बोलाविले. यावेळी फिर्यादी व त्यांच्या मुलग्याने लाचलुचपत विभागाकडे धाव घेतली. याबाबतची रितसर तक्रार दिली. यानंतर फिर्यादीचा मुलगा सायंकाळच्या सुमारास अलंकार हॉल येथे विजय कारंडे व किरण गावडे यांना भेटण्यास गेला. यावेळी विजय व किरण यांनी 10 लाख रुपये कुठे आहेत. अशी विचारणा केली. यावेळी फिर्यादीच्या मुलग्याने रक्कम देण्यासाठी आजचा दिवस लागेल बँकेतून व मित्रांकडून रक्कम गोळा करत आहे, असे सांगितले. यानुसार शुक्रवारी दुपार पर्यंतची वेळ फिर्यादीच्या मुलग्याने मागून घेतली. यावेळी या दोघांनी लाच मागितल्याचे नियमाप्रमाणे सिद्ध झाले.