राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता त्यांच्या कुटुंबीयांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेमुळे एसटी महामंडळात चलबिचल सुरू झाल्याने यापुढे कर्मचाऱ्यांचे निलंबन न करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
एसटी वाहतूक सुरू करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चालक आणि वाहक म्हणून काम करण्याचे फर्मानही महामंडळाने काढले आहेत. यांत्रिक कर्मचारी व सहायक वाहतूक निरीक्षक यांचा वापर ‘चालक’ म्हणून आणि वाहतूक नियंत्रकांचा वापर ‘वाहक’ म्हणून करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. निवृत्तीनंतर तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळालेले कामगार विभागाचे महाव्यवस्थापक माधव काळे यांच्या सहीने याबाबतचे लेखी आदेश काढले आहे. एसटी संप सुरू असल्याने कर्मचाऱ्यांना गेल्या ८५ दिवसांपासून पगार मिळालेला नाही. पगार नसल्याने ६५ हजारांहून अधिक कर्मचारी आर्थिक संकटात आहेत. अशातच घर खर्चासाठी पैसे नसल्याने सोलापूरमधील २० वर्षीय अमर तुकाराम माळी या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तुकाराम माळी आंदोलनात सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर त्यांच्या मुलाने हे पाऊल उचलले. आर्थिक समस्यांना कंटाळून एसटीतील ८० संपकरी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. या काळात एकाही कुटुंबीयांचे महामंडळाकडून सांत्वन करण्यात आलेले नाही.
राज्य सरकार आणि महामंडळाच्या निष्क्रियतेमुळे सर्वच संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत असल्याचा दावा आझाद मैदानातील संपकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, याबाबत महामंडळाला विचारले असता केवळ ३२ आत्महत्या झाल्याची नोंद आहे, असे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. वाढत्या आत्महत्येमुळे नव्याने एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन न करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला सध्या निलंबित कर्मचाऱ्यांवर मात्र बडतर्फीची कारवाई करण्यात येईल. गुरुवार अखेर ११,०२४ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यातील ४,४७२ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. ६,४३१ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. संप हाताळण्याची पद्धत अयोग्य वाहन परीक्षक आणि सहायक वाहतूक निरीक्षक या अधिकाऱ्यांना २ दिवसांचे उजळणी प्रशिक्षण आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांना ७ दिवसांचे प्रवासी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देऊन थेट प्रवासी वाहतुकीवर ‘चालक’ म्हणून रवाना होण्याच्या सूचना आहेत. कामगार विभागाने काढलेल्या आदेशामुळे वरिष्ठ पदावर सेवा बजावलेल्या अधिकारी वर्गामध्ये प्रचंड खदखद आहे. ही संप हाताळण्याची पद्धत अयोग्य आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.