तर मग शिवसेनेची ताकद दाखवून देऊ : मा.आ.चंद्रदीप नरके

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक सर्वच पक्षांनी स्वतंत्र लढावी. म्हणजे या निवडणुकीत स्वतःच्या पक्षाची तसेच शिवसेनेची ताकद काय आहे हे सर्वांनाच समजेल. त्यामुळे ही पोट निवडणूक लढवण्यास पक्षप्रमुखांनी परवानगी द्यावी असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसंदर्भात शिवसेनेची आज (सोमवारी) शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना चंद्रदीप नरके म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्याला खेळीमेळीचे राजकारण करण्याची सवय आहे. जिल्हा बँक, तसेच गोकुळच्या निवडणुकीवेळी ते दिसूनही आले आहे. जिल्ह्यातील बऱ्याच निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या पक्षांविरोधात भाजप तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप एकत्रित असताना शिवसेना विरोधात असे आघाडी-युती समीकरण बऱ्याच वेळा झाले आहे. त्यामुळे ही लढत मैत्रीपूर्ण व्हावी. निवडून आल्यानंतर ही जागा महाविकास आघाडीची असणार आहे. त्यामुळे खेळीमेळीची लढाई करण्यासाठी पक्षप्रमुखांनी परवानगी द्यावी असे चंद्रदीप नरके म्हणाले.

यावेळी खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार राजेश क्षीरसागर, आ.प्रकाश आबिटकर,सत्यजित पाटील-सरूडकर,उल्हास पाटील,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे,संजय पवार, शहर प्रमुख विशाल हारुगले आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.