राज्यात गारवा कायम

पुणे : उत्तरेकडील राज्यातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील गारवा कायम आहे. बहुतांश भागात रात्रीचे किमान आणि दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या खाली आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाळी स्थिती दूर होऊन तापमानात घट झाल्याने थंडी अवतरली आहे.

आठवड्यापासून राज्यात थंडीचे आगमन झाले आहे. सुरुवातीला उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई परिसरात थंडीचा कडाका वाढला होता. सध्या तेथील तापमानात किंचित वाढ झाली असली, तरी ते सरासरीच्या खाली असल्याने गारवा जाणवत आहे. मध्य महाराष्ट्रातही बहुतांश भागात गारवा कायम आहे. विदर्भात पावसाळी वातावरण होते. काही भागात गारपीटही झाली. मराठवाड्यातही पावसाळी वातावरण होते. त्यामुळे या भागातील रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या पुढे गेले होते. मात्र, सध्या सा भागातील पावसाळी वातावरण दूर होऊन थंडी वाढली आहे. उत्तरेकडील काही राज्यांत सध्या थंडीच्या लाटेची आणि थंड दिवसाची स्थिती आहे. मध्य प्रदेशमध्ये थंडीची लाट आहे. त्यामुळे राज्यातील तापमानातील घट कायम राहिली आहे.