पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटीच्या निषेधार्थ भाजपचे राज्यव्यापी जनजागरण आंदोलन

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब राज्यातील दौऱ्यावेळी राज्य शासनाने सुरक्षेत त्रुटी ठेवल्याने त्यांचा जीव धोक्यात आला होता. या विरोधात भाजप राज्यव्यापी जनजागरण आंदोलन करणार आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

गेल्या आठवडय़ात पंतप्रधान मोदी पंजाब दौऱ्यावर असताना तेथील काँग्रेस सरकारने सुरक्षित त्रुटी ठेवून कटकारस्थान रचले. पंतप्रधानांचे प्राण धोक्यात आणले होते. सक्षम संरक्षण यंत्रणेमुळे मोदी या संकटातून बचावले. तथापि हा प्रकार मोदी यांच्या हत्येचा नियोजित कट होता हे एका स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आले आहे, असा उल्लेख करून आमदार पाटील म्हणाले, पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी योग्य सुरक्षा राखण्यात पंजाब सरकार अपयशी ठरले आहे. एका स्टिंग ऑपरेशनमध्ये या सर्व घटनांची घटना दिसून आल्या आहेत. आंदोलक आणि पोलिस अधिकारी हे एकत्रित चहापान करत असल्याचे तसेच शेतकऱ्यांची भूमिका मांडणारे खलिस्तानवादी होते, असेही त्यामध्ये दिसून आले आहे.

 पाकिस्तानची सीमा जवळ असताना पंतप्रधानांच्या सुरक्षित हलगर्जीपणा केला गेला. तरीही काँग्रेस नेते या प्रकाराची खिल्ली उडवत आहेत. हे सारे चिंताजनक आहे. पंतप्रधानांच्या जिवाशी खेळण्याचा हा सारा प्रकार गलथानपणा स्पष्ट करणारा आहे. पंजाबमध्ये झालेल्या गंभीर व धोकादायक गफलतीबाबत भाजप राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.