संसदेत करोनाचा स्फोट : ७१८ कर्मचारी पॉझिटिव्ह

मुंबई : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यास काही दिवस उरलेले असताना, याच दरम्यान संसद भवनातील शेकडो कर्मचाऱ्यांना करोनाचा फटका बसला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेत पूर्ण करणे मोठे आव्हान ठरू शकते. तिसऱ्या लाटेत गेल्या एका महिन्यात संसद भवनातील ७१८ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे.

त्यापैकी बहुतेकांना गेल्या दोन आठवड्यांत संसर्ग झाला आहे. ९ जानेवारीपर्यंत सुमारे ४०० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली होती, मात्र बुधवारी हा आकडा ७०० च्या पुढे गेला आहे. गेल्या तीन दिवसांत या आकडेवारीत तब्बल ४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाधितांपैकी सुमारे २०० कर्मचारी राज्यसभेतील आहेत. उर्वरित लोकसभेसह अन्य विभागांशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. लोकसभा आणि राज्यसभेने त्यांच्या एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. तर ५० टक्के अधिकाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात संसर्ग होणे ही चिंतेची बाब आहे.