नवी दिल्ली वृत्तसंस्था : कारवाईसाठी भाग पाडल्यास मोठी किंमत वसूल करावी लागेल अशा शब्दांत भारताचे लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला सज्जड दम दिला आहे. भारत आणि चीन यांच्यादरम्यान बुधवारी १४वी सैन्यस्तरावरील चर्चा आयोजित करण्यात आली होती. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी म्हंटलं आहे.
यावेळी नरवणे यांनी सीमाभागातील घुसघोरी आणि पाकिस्तान, तसेच चीनसोबतचे भारताचे संबंध याविषयी भूमिका स्पष्ट केली.यावेळी बोलताना जनरल नरवणे म्हणाले की, पश्चिमेकडील सीमाभागात, विशेषत: नियंत्रण रेषेजवळ बराच काळ परिस्थिती तणावपूर्ण होती. सध्या परिस्थितीत सुधारणा होत आहे. पण तरी देखील या भागात दहशतवादी कारवाया वाढू लागल्या असून नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पश्चिमेकडील शेजारी देशाचे सुप्त मनसुबे यातून उघड होत आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. पण आम्ही दहशतवाद खपवून घेणार नाही. जर आम्हाला भाग पाडण्यात आलं, तर याची गंभीर किंमत वसूल केली जाईल”, अशा शब्दांत लष्कर प्रमुखांनी दम दिला आहे.
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यापासून उत्तर आणि पश्चिमेकडच्या सीमाभागात सकारात्मक घडामोडी घडत आहेत. एकीकडे आम्ही चर्चेच्या मार्गाने शांतता आणण्याचा प्रयत्न करत असतानाच उत्तरेकडच्या सीमारेषेवर भारतीय लष्कर कोणत्याही प्रकारच्या कारवाईसाठी सज्ज आहे, असं नरवणे यावेळी म्हणाले.