ना.उदय सामंत यांच्याकडे विद्यार्थ्याने केली ‘ही’ अजब मागणी

मुंबई वृत्तसंस्था : ऑनलाइन शिक्षण घेऊन बोगस पदवी मिळणार असेल तर त्याऐवजी देशी दारूच्या दुकानाचा परवाना द्या, अशी मागणी पवन जगडमवार या विद्यार्थ्याने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्याने हे पत्र पाठवलं आहे. पवन जगडमवार हा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलात शिक्षण घेत आहे.

“ऑनलाइन शिक्षण लादले जात आहे. ऑनलाइन वर्गात ४० विद्यार्थ्यांची संख्या असेल तर आठ ते दहाच विद्यार्थी त्यावर उपस्थित असतात. बाकी विद्यार्थ्यांनकडे चांगले मोबाइल नाहीत. ग्रामीण भागात इंटरनेट सेवाही नीट नाही. अनेक ठिकाणी नेटवर्कच येत नाही. कधी लाईटच नसते. अशा स्थितीमध्ये शिक्षण कसे घ्यायचे?,” असा प्रश्न जगडमवार याने पत्राद्वारे उपस्थित केला आहे.

“राज्यात शिक्षणापेक्षा दारूला जास्त महत्वाचे स्थान प्राप्त झाले. ऑनलाइन शिक्षण शिकून तरी काय फायदा, कारण त्यात प्रात्यक्षिक ज्ञान काहीच मिळत नाही. त्यामुळे अशा शिक्षणापेक्षा दारूचा परवाना मिळाल्यास उपाशी मरणार नाही,” असं या विद्यार्थ्याने पत्रात म्हटलं आहे. सर्व नियमांचे पालन करून दारूचा व्यवसाय करेन, योग्य दरातच त्याची विक्री करेन, निवडणुकीच्या काळात व बंदीत ज्या पद्धतीने दारूची विक्री केली जाते त्याचा दुरुपयोग करणार नाही,” असेही या विद्यार्थ्यांने पत्रात म्हटले आहे.

कोरोना, ओमायक्रॉनचा प्रसार वाढत असल्याने राज्यातील शाळा, कॉलेज, विद्यापीठ बंद ठेऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. दारू दुकाने मात्र निर्धास्तपणे सुरू आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात जाऊन ऑफलाइन शिक्षण घ्यायला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणापेक्षा देशी दारूचा परवाना मिळावा अशी मागणी या विद्यार्थ्याने केली आहे.