संक्रांतीमुळे कवलापूरच्या गाजरांचे दर गगनाला भिडले…..

सांगली : सांगलीपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कवलापूरच्या सवाळ पाण्यात तयार झालेल्या गोड गाजरांना संक्रांतीमुळे सोन्याचा दर मिळत आहे. राज्याच्या विविध शहराबरोबरच कर्नाटकमध्येही कवलापूरची गाजरे विक्रीसाठी रवाना होत असून आणखी दोन दिवस दर वाढते राहतील, असा उत्पादक शेतकऱ्यांचा अंदाज आहे.

संक्रांतीच्या सणाला असलेले गाजराचे महत्त्व लक्षात घेऊन कवलापूर गावामध्ये सुमारे ४०० एकर क्षेत्रावर गाजराचे उत्पादन या वर्षी घेण्यात येत आहे. सेंद्रिय पद्दतीने पूर्णपणे सवाळ पाण्यावर अवघ्या तीन महिन्यांत तयार होणाऱ्या या गाजराची चव मात्र अन्य गाजरांच्या तुलनेत अधिक गोड असते. लाल व लांबट निमुळती असलेल्या या गाजरांना पुण्या-मुंबईसह कर्नाटकातील बेळगाव, निपाणी, विजापूर आदी शहरातून मागणी वाढली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून गाजरे बाजारात पाठविण्यास सुरुवात झाली आहे. प्रारंभीच्या काळात सात ते दहा रुपये किलोचा दर होता. मात्र, संक्रांतीमुळे दरात वाढ झाली असून सध्या २२ ते २३ रुपये किलोने गाजरांची खरेदी जागेवर येऊन व्यापारी करीत आहेत. आणखी दोन दिवस दर चांगला मिळेल. मात्र, त्यानंतरही गाजराचा ग्राहक कायम राहणार असला, तरी दरामध्ये घसरण होण्याची शक्यता आहे.