महाराष्ट्रातील पक्षिवैभव जतन करण्यासाठी शासनाने प्रोत्साहनपर धोरण आखण्याची गरज

सोलापूर : महाराष्ट्रातील पक्षिवैभव जतन करण्यासाठी शासनाने प्रोत्साहनपर धोरण आखण्याची गरज आहे. निसर्गनिर्मित व मानवनिर्मित संकटांमुळे अलीकडे पक्षी घायाळ होण्याचे प्रमाण वाढले असून त्यासाठी तालुका पातळीवर पक्षी अधिवास उपचार केंद्रे उघडावीत. पक्षिमित्रांना ओळखपत्रे द्यावीत, अशा सूचना ३४ व्या महाराष्ट्र राज्य पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. निनाद शहा यांनी केल्या.

सोलापुरात डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सुरू झालेल्या राज्य पक्षिमित्र संमेलनात अध्यक्षपदावरून प्रा. डॉ. शहा बोलत होते. वन राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते झाले. या वेळी व्यासपीठावर राज्य पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर (अमरावती) यांच्यासह सोलापूरचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, सामाजिक वनीकरण विभागाच्या मनीषा पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनाचे संयोजक डॉ. मेतन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. निनाद शहा यांनी महाराष्ट्रातील आणि सोलापूर जिल्ह्यातील पक्षिवैभवावर भाष्य केले. सोलापूर जिल्ह्यात वनक्षेत्र अत्यल्प असले तरी येथे पक्ष्यांची, वन्यजीवांची संख्या लक्षणीय आहे. किंबहुना पक्ष्यांचे माहेरघर म्हणूनच सोलापूरची ओळख आहे. अलीकडे पवनचक्की, सौरऊर्जा यंत्रे, तसेच पतंग उडविताना नॉयलऑन मांजाचा होणारा वाढता वापर यामुळे पक्ष्यांचे घायाळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी पक्षिमित्र मंडळी पक्षिप्रेमापोटी स्वयंप्रेरणेने पक्षी उपचार अधिवास केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज आहे. तालुका पातळीवर अशी केंद्रे सुरू व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पक्ष्यांचे वैभव सांभाळण्यासाठी आणि पक्ष्यांचे संवर्धन होण्यासाठी शासनाकडून सकारात्मक भूमिका मांडली. सोलापूर जिल्ह्यात विविध जातीच्या तब्बल ३७३ पक्ष्यांचा अधिवास असून याशिवाय फुलपाखरांच्या शंभर आणि वन्यजीवांच्या ३० प्रजाती आढळून येतात. शासनाकडून गवत लागवड कार्यक्रम, पाणवठे तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे जैव विविधता वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले. पक्षिमित्र संमेलनात पहिल्या दिवशी दोन कार्यशाळा झाल्या.