महापुरुषांच्या सर्व पुतळ्यांच्या डोक्यावर छत्री उभारण्याची शिवसेची मागणी…

मुंबई : देशासाठी, समाजासाठी मोठे योगदान देणाऱ्या अनेक महापुरुषांचे पुतळे मुंबईत ठिकठिकाणी आहेत. या महापुरुषांच्या पुतळ्यांचे ऊन-पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी सर्व पुतळ्यांच्या डोक्यावर कायमस्वरूपी छत्री उभारा, अशी मागणी शिवसेनेने मुंबई महापालिकेकडे केली आहे.

देशासाठी, समाजासाठी योगदान देणाऱ्या अनेक महापुरुषांचे पुतळे मुंबईत आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांचा समावेश आहे. देशासाठी योगदान देणाऱ्या या महापुरुषांबद्दल समाजातील प्रत्येकामध्ये आदर, प्रेमभावना आहे. काही पुतळे हे काही संस्थांनी तर काही राज्य सरकारच्या वतीने उभारण्यात आले आहेत. मात्र यातील काही पुतळे आणि पुतळ्यांच्या आजूबाजूचा परिसर हा अस्वच्छ असतो. त्यामुळे ऊन-पावसापासून पुतळ्यांचे संरक्षण करण्यासाठी सर्व पुतळ्यांच्या डोक्यावर कायमस्वरूपी छत्री उभारा तसेच आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी नेमावेत, अशी ठरावाची सूचना शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी मुंबई महापालिकेच्या महासभेत केली आहे.