जालना : आपण हळूहळू करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सर्वाधिक रुग्णसंख्येकडे चाललो आहोत. त्यामुळे राज्यात सर्वांनाच अधिक सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले,की राज्य सरकारने करोना प्रतिबंधासाठी काही निर्बंध घातलेले असून पुढील काळात निर्बंधांचे पालन होत नसताना दिसले तर अंमलबजावणी यंत्रणेस अधिक कारवाई करावी लागेल. कोणत्याही ठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. शासनाने घातलेल्या निर्बंधांचे पालन झाले नाही तर गुन्हे दाखल करावे लागतील.
रुग्णसंख्या वाढताना दिसत असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तज्ज्ञांशी चर्चा करून आणि ओमायक्रॉनचे जगभरातील अनुभव पाहून शासन निर्णय घेत असते. राज्यात रुग्ण संख्या वाढलेली असली तरी रुग्णालयांतील संख्या तसेच प्राणवायू वापराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले नाही. आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र शासन यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अत्यावश्यक नसलेल्या सेवांवर रात्री ११ ते पाच दरम्यान निर्बंध घालण्याचा प्रस्ताव असला तरी त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. रुग्णवाढीवर प्रतिबंध येण्यात अडचणी आल्या तर भविष्यात अत्यावश्यक नसलेल्या काही सेवांवर भविष्यात बंधने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु याबाबतचा निर्णय रुग्णवाढीच्या प्रमाणावर अवलंबून असेल.