नवी मुंबई : लातुरच्या उदगीर येथे होणाऱ्या आगामी ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांची सर्वानुमते निवड झाली आहे. संमेलनाचा अध्यक्ष निवडण्यासाठी आज (रविवारी) उदगीर येथे महामंडळाची बैठक होती. या बैठकीत सासणे यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आला.
सासणे यांचे नाव सुरूवातीपासून चर्चेत आघाडीवर होते त्यामुळे त्यांची निवड जवळपास निश्चतच मानली जात होती.यापुढच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ‘चालता- बोलता’ हवा, अशी अपेक्षा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिकच्या संमेलनात व्यक्त केली होती. ती अपेक्षा लगेच उदगीरच्या संमेलनात पूर्ण झाली आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर या महामंडळाच्या तीन घटक संस्थांनी अध्यक्षपदासाठी जी नावे सुचवली आहेत त्यात सासणे यांच्यासोबतच अनिल अवचट, अच्युत गोडबोले, डॉ. रामचंद्र देखणे यांचीही नावे चर्चेत होती.