विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे-नगर महामार्ग आज बंद

वाघोली – पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे-नगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे या मार्गावरील वाहतूक 31 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी पाचपासून ते एक जानेवारी 2022 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तरी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलीस विभाग व प्रशासनाकडून करण्यात आले आहे.प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनामध्ये चाकण ते शिक्रापूर आणि शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील सर्व प्रकारची वाहतूकही पूर्णपणे बंद असेल. तसेच अहमदनगरकडून पुणे, मुंबईकडे येणारी जड वाहने ही शिरूर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगांव, चौफुला, यवत, हडपसर या पर्यायी मार्गे पुण्याकडे येतील. पुणे बाजूकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड वाहने ही खराडी बायपास येथून हडपसर, पुणे- सोलापूर रस्त्याने चौफुला, केडगाव मार्गे न्हावरा, शिरूर, अहमदनगर हमरस्ता अशी वळविण्यात आली आहे.सोलापूर रस्ता आळंदी, चाकण या भागात जाणारी जड वाहने हडपसर, मगरपट्टा, खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी आणि चाकण येथे जातील. मुंबई येथून अहमदनगर बाजूकडून जाणारी जड तसेच माल वाहतुकीची वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्ग अहमदनगर अशी जातील. मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने, (उदा. कार, जीप) वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूर मार्गे अहमदनगर अशी वळविण्यात आली आहेत.