कागल: ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय हालचालींचा केंद्रबिंदू आता कागल बनला आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष कागलकडे लागले आहे. न्यायालयीन आणि प्रशासकीय पातळीवर दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जिल्ह्यासह राज्यातील नेत्यांचेही लक्ष कागलच्या घडामोडींकडे आहे.
‘गोकुळ’चे नेतृत्व राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्याकडे आहे. त्यांचे चिरंजीव संघाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. तसेच इतर ज्येष्ठ नेतेही संचालक मंडळात आहेत. त्यामुळे कागल तालुक्यातील राजकीय घडामोडींना ‘गोकुळ’च्या निवडणुकीच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
महायुतीकडूनही निविदा मागवण्यात आल्या आहेत. विविध गटांकडून ठराव गोळा करण्याबरोबरच निवडणुकीची मोर्चेबांधणी वेगाने सुरू आहे.
दरम्यान, लाखमोलाच्या ठरावांसाठी आगाऊ टोकन देऊन ‘बुकिंग’ केल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. काही ठिकाणी ठरावांचा लिलाव झाल्याचीही चर्चा आहे.
जिल्ह्यातील मातब्बर राजकीय घराणी जिल्हा बँक व ‘गोकुळ’च्या निवडणुकीत आपल्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याने आगामी काळात राजकारण अधिक रंगण्याची चिन्हे आहेत.
