कोल्हापूर: राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथील 20 वर्षीय तरुणाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. अग्निवीर भरतीसाठी तयारी करत असलेल्या या तरुणाचे स्वप्न अधुरे राहिल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

राशिवडे येथील आदर्श संतोष शिल्ली हा तरुण खेळांमध्ये हुशार होता. त्याने अग्निवीरच्या भरतीची तयारी सुरू केली होती. एकुलत्या एका मुलग्याची धडपड पाहून आई-वडिलांनीही त्याला पाठींबा दिला होता. 4-5 दिवसांपूर्वी अग्निवीरच्या यादीत त्याचे नाव लागले. त्यानंतर पुढील परीक्षांची तयारी सुरू झाली.
पण त्याचवेळी त्याला अचानक डेंग्यूची लागण झाली. उपचारासाठी त्याला प्रथम भोगावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृतीत फारशी सुधारणा न झाल्याने त्याला पुढे कोल्हापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान बुधवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला.
तरुणाच्या जाण्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्याच्या पश्चात वडील, आई, बहीण आणि मुलगी असा परिवार आहे.
डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे. आरोग्य यंत्रणांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
