विनाअनुदानित महाविद्यालयांच्या विविध प्रलंबित विषयांबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

मुंबई:राज्यातील विनाअनुदानित महाविद्यालयांच्या विविध प्रलंबित विषयांबाबत  मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री  चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित महाविद्यालय संघाच्या प्रतिनिधींनी कायम विनाअनुदानित महाविद्यालयांसमोरील विविध शैक्षणिक, प्रशासकीय व धोरणात्मक विषयांबाबत सविस्तर निवेदन सादर केले.

 

 

या बैठकीत महाविद्यालयाची गुणवत्ता वाढ, या महाविद्यालयांना शासनाकडून आर्थिक पाठबळ उपलब्ध करणे, विविध सरकारी व खाजगी क्षेत्रांसाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे यासाठी त्याक्षेत्राचा सहभाग, त्यांना अपेक्षित असणारा अभ्यासक्रम निर्मिती, विद्याथ्यांना संशोधनात्मक शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शासनाचे पाठबळ, महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या कामावर व कामाच्या गुणवत्तेवर आधारित वेतन निश्चिती करणे या विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच शासनाच्या अधिकारक्षेत्रातील विषयांचा सविस्तर अभ्यास करून नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट केले.

 

या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव संतोष खोरगडे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित महाविद्यालय संघाचे श्री.सचिन सूर्यवंशी (सचिव), श्री. मोहन परितकर, श्री. अनिरुध्द गाढवे, श्री. रवींद्र दिंड, श्री. नवनाथ पवार, श्री. जे. बी. पाटील, श्री. अजय चौगुले, श्री. स्वागत परुळेकर, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

🤙 8080365706