राधानगरी: कोल्हापूर जिल्ह्याचे निसर्गपर्यटनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या राऊतवाडी धबधब्यासह राधानगरी अभयारण्याला आज पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट दिली.

राऊतवाडी धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. पर्यटकांच्या सोयी-सुविधांची पाहणी करून त्यांच्याशी थेट संवादही त्यांनी साधला.
यानंतर राधानगरी अभयारण्यातील वन्यजीव कार्यालयाजवळील पर्यटन निवासाची पाहणी केली. हे निवास लवकरात लवकर सुसज्ज करून पर्यटकांसाठी सुरू करावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी पर्यटन निवासाजवळ कृत्रिम समुद्रकिनारा तयार करणे आणि 14 प्रकारचे एडवेंचर स्पोर्ट्स उभारण्याच्या कामाचा आढावा घेण्यात आला. पर्यटनाला चालना देण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
कार्यक्रमात वन्यजीव विभागाच्या वतीने पर्यटकांसाठी नव्याने दाखल झालेल्या मड रेसिंग कार आणि तीन जंगल सफारी व्हॅनचे लोकार्पणही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष दिपक शेट्टी, युवा सेनेचे तालुकाप्रमुख मयुर पोवार, शशिकांत बैलकर, भगवान पाटील, अजय भंडारी, अभिजीत हुपरीकर, शरद पाटील, चैतन्य कोरगावकर, राजेंद्र चव्हाण, विशाल म्हाबळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
