कोल्हापूर : राजकारणात आल्यानंतर मी सुरुवातीला काही ध्येय ठरवली होती. त्यावेळी आमचे जेष्ठ सहकारी बाळ पाटील, शिवाजीराव गाडेकर यांच्यापुढे मी सांगायचो की एक दिवस मी आमदार होईन, राज्याचा मंत्री होईन आणि पुढे खासदार म्हणून केंद्रात देखील जबाबदारी सांभाळेन. जवळपास 40 वर्षांपूर्वी पाहिलेल्या यापैकी दोन गोष्टी पूर्ण झाल्या आहेत. आता अजून एक ध्येय बाकी आहे, असे मत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे कागलमध्ये सध्या बरीच चर्चा सुरू आहे.

स्थानिक पाझर तलाव पर्यटन केंद्रावर झालेल्या “चाय पे चर्चा” या कार्यक्रमात त्यांना राजकीय करिअर आणि भविष्यातील योजना याबद्दल विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, सध्या पुन्हा एकदा आमदार म्हणून काम करण्यावर भर आहे. त्यानंतर खासदारकीबाबत विचार केला जाईल. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जे काम सोपवतील ते मी पूर्ण निष्ठेने करेन.
