10 वी व 12 वीच्या परीक्षा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली  59 केंद्रांवर कॉपीमुक्त अभियान राबविणार

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जून-जुलैमध्ये होणाऱ्या इयत्ता 10 वी व 12 वीच्या लेखी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व परीक्षा

 

केंद्रांवर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव अनुराधा म्हेत्रे यांनी दिली.

 

इयत्ता 10 वीची लेखी परीक्षा 16 ते 30 जून या कालावधीत, तर इयत्ता 12 वीची लेखी परीक्षा 26 जून ते 8 जुलै या कालावधीत होणार आहे. कोल्हापूर विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रात सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील एकूण 59 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार असून त्यामध्ये इयत्ता 10 वीसाठी 34 आणि इयत्ता 12 वीसाठी 25 केंद्रांचा समावेश आहे. 10 जून अखेर प्राप्त माहितीनुसार इयत्ता 10 वीसाठी 3 हजार 226, तर इयत्ता 12 वीसाठी 8 हजार 53 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले असून, दोन्ही परीक्षांसाठी एकूण 11 हजार 279 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.

 

परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असून, परीक्षेशी संबंधित कर्मचारी गैरप्रकारात सहभागी असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरोधातही कठोर कारवाई केली जाणार आहे.

 

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी आदी सदस्यांचा समावेश असलेल्या जिल्हास्तरीय दक्षता समित्या परीक्षेच्या कामकाजावर देखरेख ठेवणार आहेत. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लेखनाबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी निवडक विषयांचे मार्गदर्शक व्हिडिओ युट्यूब व विभागीय मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

0000

🤙 8080365706