महापालिकेच्या विविध प्रकल्पांचा अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.के.एच.गोविंदराज यांनी घेतला आढावा

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात सकाळी आयोजित बैठकीत शहरातील प्रलंबित प्रकल्प, विकासकामे व आर्थिक बाबींवर चर्चा करण्यात आली.

 

 

 

 

बैठकीपूर्वी महापौर सौ. रुपाराणी निकम, आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, सभागृह नेते मुरलीधर जाधव, गटनेते शारंगधर देशमुख, आदिल फरास व इंद्रजित बोंद्रे यांनी डॉ.के.एच. गोविंदराज यांचे शाल, श्रीफळ, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, छत्रपती ताराराणी व छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिकृती तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 

यानंतर महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत अतिरिक्त मुख्य सचिवांशी चर्चा केली. भारतीय जनता पार्टी, शिवसेना व काँग्रेसच्या वतीने विविध विषयांवरील निवेदने यावेळी देण्यात आली.

 

प्रशासकीय बैठकीत आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून महापालिकेच्या विविध प्रकल्पांची माहिती सादर केली. अमृत 1 व 2 योजना, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, अंबाबाई विकास आराखडा, शेंडा पार्क येथील नवीन प्रशासकीय इमारत, केशवराव भोसले नाट्यगृह तसेच शाहू मिल परिसरातील छत्रपती शाहू महाराज स्मारक आदी प्रकल्पाच्या कामाची सद्यस्थिती त्यांनी मांडली. यावेळी शासनस्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव, निधी व अनुदानाबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली. नवीन महापालिका इमारतीसाठी आवश्यक निधी, एल.बी.च्या 7 ते 8 कोटी रुपयांच्या वाढीव निधीची मागणी आयुक्तांनी केली. तसेच महापालिकेची सेवा प्रवेश नियमावली मंजूर झाल्यानंतर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. विविध प्रकल्पांपोटी सुमारे 138 कोटी रुपयांचा निधी येणे बाकी असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असून नागरिकांच्या अपेक्षा वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. सिव्हिल वर्कची कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत, पाणीपुरवठा व्यवस्थेतील गळती कमी करून वसुली वाढवावी, कचरा प्रक्रिया प्रकल्पातून उत्पन्न वाढविण्यावर भर द्यावा अशा सूचना त्यांनी दिल्या. सर्व पदाधिकारी व सदस्यांमध्ये समन्वय ठेवून नागरिकाभिमुख प्रशासन राबवावे असेही त्यांनी नमूद केले. महापालिकेचे प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 

या बैठकीनंतर डॉ. गोविंदराज यांनी नर्सरी बाग येथील छत्रपती शाहू समाधीस्थळ, सरस्वती टॉकीज परिसरातील वाहनतळ तसेच केशवराव भोसले नाट्यगृहाच्या सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून उर्वरीत कामांची अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

 

यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर, उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉ.विजय पाटील, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत भोसले, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनील बिद्री, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर रचनाकार एन.एस.पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, कामगार अधिकारी राम काटकर, रवका अधिकारी प्रशांत पंडत, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंह रजपूत, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे व कर्मचारी उपस्थित होते.

🤙 8080365706