कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठातील सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या वतीने ‘जागतिक पर्यावरण दिन – पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी मिशन लाईफ (LiFE) अभियान’ अंतर्गत विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे अभियान दिनांक २५ मे ते ५ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. ही माहिती केंद्राचे संचालक प्रा. डॉ. मुरलीधर भानारकर यांनी दिली आहे.

यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना “हवामान बदल” ही असून पृथ्वीसमोरील वाढत्या पर्यावरणीय आव्हानांबाबत जनजागृती निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. अभियानांतर्गत ऊर्जा बचत, पाणी संवर्धन, प्लास्टिकमुक्त जीवनशैली, ई-कचरा व्यवस्थापन, कचरा निर्मूलन, शाश्वत अन्नप्रणाली आणि आरोग्यदायी जीवनशैली या सात प्रमुख विषयांवर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या अभियानाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते दिनांक २५ मे रोजी होणार असून याप्रसंगी कुलसचिव डॉ. विलास शिंदे उपस्थित राहणार आहेत. या अभियानाचा भाग म्हणून विद्यापीठ परिसरात ई-कचरा संकलन मोहीम आयोजित करण्यात येणार असून मोबाईल, चार्जर, बॅटऱ्या, जुने संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, केबल्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्याचे सुरक्षित संकलन करण्यात येणार आहे.
दि. २६ मे रोजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत जनजागृतीपर पोस्टर्स, डिजिटल स्क्रीनसेव्हर्स आणि सोशल मीडिया मोहिमेद्वारे पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला जाणार आहे. दि. २७ मे श रोजी ‘ई-कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास’ या विषयावर ऑनलाइन प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून ग्रीस येथील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, डॉ. रानिया लंपाऊ या मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर २९ मे रोजी ‘ई-कचरा व्यवस्थापन व शाश्वत विकास’ विषयावर सिद्धार्थ शिंदे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच ३० मे रोजी “समाज आणि शाश्वत विकास : शिक्षकांची भूमिका”या विषयावर डॉ. सुधीर कुंभार यांचे ऑनलाईन व्याख्यान होणार आहे.
या अभियानांतर्गत विद्यापीठ परिसर व संलग्न महाविद्यालयांमध्ये ई-कचरा सर्वेक्षण आणि लेखापरीक्षण देखील राबविण्यात येणार आहे. गूगल फॉर्मच्या माध्यमातून हे सर्वेक्षण २५ मे ते १ जून या कालावधीत करण्यात येणार आहे. या अभियानाचा समारोप कार्यक्रम ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनी होणार आहे.
