कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षांपासून पावसाळ्यामध्ये उद्भवलेली पूर परिस्थिती पाहता अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक राज्य सरकारशी समन्वय राखा अशी मागणी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हंटले आहे, की अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, आरोग्य, जिल्हा परिषद, महानगरपालिका इत्यादी सर्व महत्त्वाच्या यंत्रणांना त्यांच्या विभागामध्ये पुर व्यवस्थापनाचा नियंत्रण कक्ष उभारणेबाबत सूचना कराव्यात. २०२१-२२ मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत बसविण्यात आलेली पब्लिक ॲड्रेस सिस्टीम कार्यान्वीत करुन त्याव्दारे पूरबाधित क्षेत्रामधील नागरिकांना पूर परिस्थिती व उपाययोजनां बाबत वेळोवेळी सूचना व माहिती द्यावी, पूरबाधित संवेदनशील घोषित केलेल्या ३९१ गावांमध्ये अन्नधान्य वितरण व्यवस्था व इतर जीवनावश्यक सामग्रींचा अधिकचा पुरवठा पूर परिस्थिती निर्माण होण्या अगोदर करावा, शहरातील ज्या ठिकाणी पुराचे पाणी येते तेथील नागरिकांसाठी निवारा केंद्रे उभारण्यात यावीत. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये सोयीसुविधा करा, पूरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या शहरी व ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात यावी. शिरोळ, हातकणंगले व करवीर या पूर प्रणव तालुक्यामधील आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व औषधांचा जादाचा साठा करुन ठेवावा. पूरग्रस्त भागातील जनावरांना स्थलांतरित करण्यासाठी जागा निश्चित करण्यात यावी. पाटबंधारे विभागाची बिनतारी संदेश यंत्रणा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी जोडून घ्यावी अशा मागण्या करण्यात आल्या.
