कुंभोज प्रतिनिधी ( विनोद शिंगे)
: शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या सन २०२४-२५ च्या शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर जिल्हा परिषदेला देशात प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित अभिनंदन सोहळ्यात शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, सभापती सारिका नांदेकर, सभापती विद्या पाटील, सभापती श्रद्धा गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन मॅडम, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सावंत मॅडम, यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना शिक्षण सभापती सौ. शितल यादव यांनी कोल्हापूर जिल्ह्याने मिळवलेले यश हे संपूर्ण शिक्षण विभागासाठी अभिमानास्पद असून ही ऐतिहासिक कामगिरी सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगितले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रभावी नियोजन, डिजिटल शिक्षणाचा वापर, सातत्यपूर्ण मूल्यांकन आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रम यांच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्याने देशात अव्वल स्थान मिळवले असल्याचे त्यांनी नमूद केले.
“शिक्षण क्षेत्रात कोल्हापूर जिल्हा कायम अग्रेसर राहावा यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. अधिकारी, शिक्षक आणि पदाधिकारी यांच्यातील समन्वय व शिक्षणाबद्दलची बांधिलकी यामुळेच आज जिल्ह्याने देशपातळीवर मानाचा तुरा मिळवला आहे,” असे मत शिक्षण सभापती शितल यादव यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती, शिक्षण समितीचे सर्व सदस्य तसेच जिल्हा परिषदेचे सदस्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना साखर पेढे वाटून अभिनंदन केले. तसेच प्रत्येकाच्या कार्याचे कौतुक करत पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यांच्या या आपुलकीच्या आणि प्रेरणादायी भूमिकेबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष तानाजी पाटील,बांधकाम सभापती सारिका नांदेकर, समाजकल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, शिक्षण समिती सदस्य एकनाथ पाटील, स्नेहल वेल्हाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जास्मिन, शिक्षणाधिकारी शेंडकर मॅडम आदींनी मनोगत व्यक्त केले व शिक्षण विभागास शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण जिल्हा परिषद परिसरात आनंदाचे वातावरण असून शिक्षण विभागाच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे
