कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचे नूतन स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी आज महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात मुख्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीच्या प्रारंभी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांनी आपली ओळख करून देत आपापल्या विभागातील कामकाजाची माहिती सादर करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील कामकाजाचा सविस्तर माहिी सभापतींना दिली.

यावेळी सभापती विशाल शिराळे यांनी विशेषत: आरोग्य स्वच्छता, वर्कशॉप व पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजामध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगितले. आरोग्य स्वच्छता कर्मचाऱ्यांना हजेरीसाठी लांब जावे लागत असल्याने त्यांची हजेरी संबंधित प्रभागातच घेण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना त्यांनी केली. तसेच शहरातील दैनंदिन कचरा उठावासाठी नियोजन अधिक सक्षम करण्यावर भर दिला.
शहरातील पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याने त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत राहील यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. अमृत योजनेतील कामे तातडीने पूर्ण करण्याबाबतही जल अभियंत्यांना निर्देश देण्यात आले. लिकेज शोधण्यासाठी जेसीबीद्वारे मोठ्या प्रमाणात खुदाई करावी लागते. त्यामुळे छोट्या लिकेज साठी मोठे खड्डे पडतात. यावर उपाय म्हणून लिकेज शोधण्यासाठी स्वतंत्र अत्याधुनिक मशिनरी खरेदी करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. काही ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना नागरिकांचा विरोध होत असल्याने प्रक्रिया पूर्ण क्षमतेने होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कामे अपूर्ण असलेल्या ठिकाणी पर्यायी नियोजन करता येईल का याचीही तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.
वर्कशॉप विभागाकडील वाहने अपुरी असून काही वाहने बंद अवस्थेत असल्याचेही त्यांनी नमूद केले. जेसीबी उपलब्ध नसल्यास कचरा व खरमातीचे ढिग उचलणे अडचणीचे होते. तसेच ट्रॅक्टर व डंपरची कमतरता भासत असल्याने वर्कशॉप विभाग अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी आरोग्य स्वच्छता विभागाच्या नियोजनाबाबत माहिती दिली. या नियोजनाची चाचपणी सोमवारी करण्यात येणार असून एका विभागीय कार्यालयात पाच प्रभाग ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक विभागीय कार्यालयाला दोन जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर कायमस्वरूपी देण्यात येणार आहेत. तसेच आरोग्य व पवडी कामगारांची संयुक्त टीम तयार करून स्वच्छता व खरमाती उठावाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सर्व विभागीय कार्यालयांसाठी प्रभाग क्षेत्रीय सभापतींची लवकरच नियुक्ती करण्यात येणार असून संबंधित भागातील सभापती, सदस्य, प्रभाग क्षेत्रीय अधिकारी व उप-शहर अभियंता यांच्या समन्वयातून कामकाज होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने अमृत योजनेतील टाक्यांचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील दोन ते चार महिन्यांत ट्रायल घेऊन या टाक्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित प्रभागांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, मस्कुती तलाव येथे नागरिकांच्या विरोधामुळे १९.५ एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम प्रलंबित असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, सहा.आयुक्त स्वाती दुधाने, कृष्णा पाटील, मुख्यलेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर रचनाकार एन एस पाटील, शाखा अभियंता अरुण गवळी, सुरेश पाटील उपस्थित होते.
