आखाती देशांत अडकलेल्या कोल्हापूरकर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासन  पूर्णतः सतर्क:पालकमंत्री प्रकाश आबिटकर 

कोल्हापूर:इराण आणि इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांत अडकलेल्या कोल्हापूरकर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासन आता पूर्णतः सतर्क झाले आहे. परदेशातील अनिश्चिततेच्या छायेखाली वावरणाऱ्या आपल्या जिल्हावासीयांना सुखरूप मायदेशी आणणे, हे सध्या प्रशासनाचे सर्वोच्च कर्तव्य आहे. या कठीण प्रसंगात जिल्ह्यातील नागरिक, पर्यटक, नोकरीनिमित्त गेलेले कर्मचारी आणि शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

केंद्र आणि राज्य शासनाच्या खांद्याला खांदा लावून जिल्हा प्रशासन या संकटग्रस्तांचे रक्षणकर्ते म्हणून उभे असून, प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण २०७ नागरिक सध्या विविध आखाती देशांत असून, त्यांच्या सुरक्षित परतीचे नियोजन आता अंतिम टप्प्यात आहे. समाधानाची बाब म्हणजे, पर्यटनासाठी गेलेले २३ नागरिक आधीच सुखरूप घरी परतले असून, उर्वरित ८० नागरिक ५ मार्च २०२६ रोजी दुबईहून प्रस्थान करतील आणि ६ मार्चपर्यंत आपल्या जिल्ह्यात सुखरूप पोहोचतील.

कतार, दुबई, इराण, इस्रायल, मोरोक्को, सौदी अरेबिया, शारजाह, कुवेत, बहरीन आणि ओमान अशा विविध देशांत अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीशी प्रशासन सातत्याने संपर्कात आहे. ज्यांचे कुटुंबीय सध्या परदेशात आहेत, त्यांनी धैर्य बाळगावे आणि मुळीच घाबरून जाऊ नये. जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष संपर्क कक्ष आणि हेल्पलाईनशी संपर्क साधून आपल्या नातेवाईकांची माहिती द्यावी, जेणेकरून मदतीचा ओघ अधिक वेगवान करता येईल. प्रशासन या आपत्तीशी लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून, नागरिकांनी प्रशासनाशी समन्वय ठेवावा, असे आवाहन केले.

 

🤙 8080365706