उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून सीएसएमटी-टिटवाळा नवीन लोकल सुरु

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे सीएसएमटी-टिटवाळा नवीन लोकल सुरु करण्याला रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिलेली आहे. मध्य रेल्वेच्या विद्यमान वेळापत्रकानुसार संध्याकाळी 6 वा. 39 मिनिटांनी सुटणाऱ्या टिटवाळा लोकलनंतर तब्बल 40 मिनिटांनी 7.18 ची कसारा लोकल सेवा सुरू होती. 40 मिनिटे वाट पाहावी लागत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यातही नोकरी व कौटुंबिक अशी दुहेरी जबाबदारी पार पाडणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची अधिक गैरसोय होत होती.

 

त्यामुळे प्रवाशांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत या कालावधीत आणखी एक लोकल फेरी वाढवण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने या मागणीचा पाठपुरावा केला. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून टिटवाळासाठी संध्याकाळी 6 वा. 57 मिनिटांनी नवीन लोकल फेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.