नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱयानिमित्त कोटय़वधी रुपयांचा चुराडा करण्यात आला. नाशिकचे ब्रॅण्डींग होणार, विकासाला चालना मिळणार, असा गवगवा करून वातावरण निर्मिती करण्यात आली.कांदा निर्यातबंदी, अस्मानी आणि सुल्तानी संकटात सापडलेल्या शेतकऱयांच्या प्रश्नांबाबत मोदींनी ‘ब्र’ही न काढल्याने शेतकऱयांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतीही घोषणा न केल्याने नाशिककरांची घोर निराशा झाली आहे. दरम्यान, भव्य रोड शो, भव्य जाहीर सभा, चलो मोदी मैदान अशा जाहिराती करूनही नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील जनतेने या सभेकडे पाठ फिरविली. यामुळे सभास्थळ अर्धेअधिक रिकामेच होते.
युवा महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. केंद्र आणि राज्य शासनाने या महोत्सवासाठी साठ कोटी रुपयांची तरतूद केली. कला, सांस्कृतिक, वक्तृत्त्व, कथा लेखनासह विविध स्पर्धा यात घेण्यात येणार आहेत. बिगर स्पर्धात्मक कार्यक्रमही होणार आहेत. मोदी यांच्या स्वागताची तयारी गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरू होती. मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा पूर्वतयारीसाठी धावते दौरे केले. मंत्री दादा भुसे, गिरीश महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून होते. विकासकामे थांबवून महापालिकेसह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा नियोजनात व्यस्त होती. कोटय़वधींचा चुराडा झाला.
