
गारगोटी : आयुष्मान भारत योजना ही भारत सरकारची एक अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत गरीब वर्गातील लोकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळत आहेत. संबंधित कुटुंबांना त्यांचे उपचार रोखरहित होण्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरत असून आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून स्व.सुशिलादेवी आबिटकर हेल्थ फौंडेशन मार्फत राधानगरी विधानसभा मतदार संघातील ५० हजार लाभार्थ्यांना आयु्ष्यमान भारत गोल्डन कार्डचे वाटप करणार असल्याचे केडीसीसी संचालक अर्जुन आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे सांगितले आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, वातावरणातील बदलामुळे रोगराईचा विविधप्रकारे प्रादुर्भाव जाणवत आहे. उपचार घेण्यासाठी सामान्यांना आयुष्याची कमाई लावावी लागते, मात्र देशात प्रथमच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरिबाला उपचार मिळाला पाहिजे असा विचार करून आयुष्यमान भारत योजना सुरू केली. या योजनेमुळे आरोग्य क्षेत्रांत क्रांती होत आहे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत गरीब लोकांवर सरकारी आणि नोंदणीकृत खाजगी रुग्णालयात ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जातात. या योजनेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ६० हून अधिक रुग्ण्यांचा समावेश असून ज्या नागरीकांकडे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड आहे अशा नागरीकांना ५ लाखपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळणार असून यामुळे राधानगरी मतदार संघात वाटण्यात येणार ५० हजार आयु्ष्यमान भारत गोल्डन कार्ड धारकांना या योजनाचा लाभ होणार असल्याचे सांगितले आहे.
