
कोल्हापूर: वाढणारे प्रदुषण हानीकारक बनत असून, प्रदुषण रोखण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे मत पर्यावरण अभ्यासक संदिप चोडणकर यांनी मांडले.

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लि. कोल्हापूर सामाजिक बांधिलकी उपक्रम व लक्ष्मी फाउंडेशन गर्जन तालुका करवीर यांच्या वतीने व समाजकार्य विभाग सायबर कॉलेज कोल्हापूर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘ग्रीन कॉलेज, क्लीन कॉलेज’ स्पर्धेच्या बक्षीस वितरणा दरम्यान ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी समाजकार्य विभागप्रमुख प्रा.डॉ. दिपक भोसले होते.तर पर्यावरण अभ्यासक प्रा.डॉ. मकरंद ऐतवडे , किर्लोस्कर सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद आजगेकर, लक्ष्मी फौंडेशनचे अध्यक्ष विनायक देसाई प्रमुख उपस्थिती होते.
प्रथम क्रमांक शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज, द्वितीय क्रमांक कला प्रबोधिनी,कोल्हापूर तर तृतीय क्रमांक समाजकार्य विभाग, सायबर यांचा आला. पुढे बोलताना संदिप चोडणकर म्हणाले की, कोल्हापूरची शान असलेली पंचगंगा दुषित झाली आहे. यासाठी विविध कारणे आहेत.पंचगंगा शुद्धीकरणासाठी किर्लोस्कर कंपनीने पाऊल उचलले आहेत हे अभिमानाचे आहे. महाविद्यालयीन युवक, तरुण मंडळे व समाजातील विविध घटकांनी पंचगंगा प्रदुषण रोखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. प्रास्ताविकात सामाजिक बांधिलकी शरद आजगेकर म्हणाले, महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाची आवड निर्माण व्हावी, त्यांना शास्त्रीय माहिती मिळावी,त्याचा उपयोग समाजासाठी व्हावा व कॉलेज परिसरात हिरवाई व स्वच्छता निर्माण करावी यासाठी किर्लोस्कर कंपनीच्या वतीने व लक्ष्मी फौंडेशनच्या सहकार्याने ‘किर्लोस्कर वसुंधरा इको रेंजर्स’ हा उपक्रम महाविद्यालयांमध्ये राबविला जात आहे. किर्लोस्कर सामाजिक बांधिलकी अंतर्गत विविध उपक्रमांची माहिती त्यांनी सांगितली.
विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सायबर समाजकार्य विभाग एक पाऊल पुढे असून किर्लोस्करच्या सामाजिक उपक्रमांना पाठबळ देणार असल्याचे प्रा.डॉ.दिपक भोसले यांनी सांगितले. यावेळी प्रा. डॉ. मकरंद ऐतवडे यांचेही भाषण झाले. स्वागत व सुत्रसंचलन विनायक देसाई यांनी केले. जिल्ह्यातील ११ महाविद्यालयांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
