नवउद्योजकांना पूरक वातावरण निर्मिती हे ‘मिशन रोजगार’चे उद्दिष्ट – आमदार ऋतुराज पाटील

कोल्हापूर: उद्योजक मेळाव्यास उपस्थित उद्योजकांना प्रमाणपत्र प्रदान करताना आमदार ऋतुराज पाटील. समवेत वैशाली अपराजित, नितीश कुलकर्णी, यासीन मालीवडे, राहुल लिमये आदी.

कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “मिशन रोजगार” या उपक्रमाच्या माध्यमातून युवा पिढीला रोजगार उपलब्ध व्हावा त्याचबरोबर नवनवीन उद्योजक तयार व्हावेत, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. नवउद्योजकांना पूरक असे वातावरण निर्माण करणे हे ‘मिशन रोजगार’चे उद्दिष्ट आहे. उद्योजक मेळाव्यातून प्रेरणा घेऊन निश्चितच नवे उद्योजक तयार होतील व इतरानांही ते रोजगार देतील याची खात्री आहे, असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले.

डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर व पुणे येथील नामांकित सॉफ्टवेअर कंपनी पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेड यांच्या “देआसरा” फाउंडेशनच्यावतीने ‘मिशन रोजगार’ अंतर्गत आयोजित उद्योजक मेळाव्यात ते बोलत होते. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे झालेल्या या मेळाव्याला ‘कोल्हापूर दक्षिण’ मधील ३१२ छोटे व्यावसायिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, ‘मिशन रोजगार’ च्या माध्यमातून कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील ५ हजार हून अधिक प्रशिक्षणार्थींनी व्यवसायाभिमुख कौशल्यांचे मार्गदर्शन घेतले आहे. यापैकी अनेकांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केले. दक्षिण मतदारसंघातील २३७५ उमेदवारांना विविध आस्थापनामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देऊ शकलो याचे समाधान आहे.व्यावसायिकांना, नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी साळोखे नगर येथील डी. वाय. पाटील कॅम्पस मध्ये इनक्युबेशन सेंटर, कौशल्य विकास केंद्र उभारण्यात आले आहे. या माध्यमातून नव्या व्यावसायिकांना मार्गदर्शन करून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहेत. कोणताही नवीन व्यवसाय सुरु करण्यापूर्वी त्या व्यवसायाचे प्राथमिक ज्ञान आपल्याला असणे आवश्यक आहे. भविष्यातही उद्योजकांसाठी सातत्याने अशा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली. ‘दे आसरा’च्या सिनिअर प्रोग्राम हेड वैशाली अपराजित म्हणाल्या, नवउद्योजक, छोटे व्यावसायिक यांच्यासाठी आमदार ऋतुराज पाटील हे ‘मिशन रोजगार’च्या माध्यमातून राबवत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. भविष्यात देखील डी. वाय. पाटील ग्रुपसोबत छोट्या उद्योजकांसाठी नवीन उपक्रम आम्ही नक्की राबवू. व्यवसाय सल्लागार राहुल लिमये यांनी छोट्या व्यवसायिकांनी त्यांचा व्यवसाय कसा वाढवावा यावर मार्गदर्शन केले. कोणत्याही व्यासायात स्पर्धा हा अपरिहार्य भाग आहे. मात्र आपण स्पर्धा का करायची, कोणाशी करायची व कशी करायची याचा निर्णय घेणे आवश्यक आहे. आपल्या व्यवसायाबद्दल १५ सेंकदात माहिती देता आली पाहिजे अशा टिप्स त्यांनी दिल्या. सोशल मिडीया तज्ञ यासीन मालीवडे यांनी सोशल मीडियाचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रभावी वापर कसा करता येईल यावर अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केले. सध्याची पिढी सर्वधिक काळ सोशल मिडीयाचा वापर करते. त्यामुळे या माध्यमाचा मार्केटिंग व विक्रीसाठी वापर करून घेणे आवश्यक असल्याचे सांगून फेसबुक, इंस्ट्राग्राम, गुगल यावर बिझनेस पेज कशी तयार करावी याची माहिती त्यांनी दिली.

उपस्थित उद्योजकांच्या विविध प्रश्नांची यावेळी तज्ञानी उत्तरे दिली. यामध्ये महिला उद्योजकांची संख्या लक्षणीय होती. यावेळी उपस्थित उद्योजकांना प्रमाणपत्र देण्यात आली. उद्योजकांच्या वतीने वैभवी जरग यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले. यावेळी ‘दे आसरा’ चे व्यवस्थापक नितीश कुलकर्णी, गोकुळ संचालक शशिकांत पाटील, प्रकाश पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, जनसंपर्क अधिकारी डी. डी. पाटील,प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, प्रा. सचिन जडगे, डॉ. अमर जाधव आदी उपस्थित होते.

🤙 8080365706