कोल्हापूर प्रतिनिधी: नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानाचे उद्धाटन पंचगंगा हॉस्पिटल येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आले.दि.२६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे.
या अभियानांर्गत १८ वर्षावरील महिला, माता व गरोदर स्त्रियांच्या आरोग्याची तपासणी, प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. ही मोहिम शासनाने निर्देशानुसार राबविण्यात येत आहे.
दरम्यान, सावित्रीबाई फुले हॉस्पीटल येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.१ येथे आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते व महाडिक माळ येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.६ येथे भागिरथी महिला मंचच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले प्राथमिक नागरी आरोगय केंद्रामार्फत प्रभात फेरीचे नियेाजन करुन भागामध्ये जनजागृती करण्यात आली.
पंचगंगा हॉस्पीटल येथे डॉ.रुपाली यादव यांनी अभियान विषयी प्रास्ताविक करुन अभियान दरम्यान महापालिकेच्यावतीने पुरविण्यात येणा-या सेवांची माहिती दिली. महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बोलताना राज्य शासनाच्यावतीने राज्यात विविध योजना व उपक्रम राबविले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” हा उपक्रम राबविला आहे. महिला आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असतात त्यांचे कामामुळे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे महिलांच्या आरोग्य सक्षम होण्यासाठी हा उपक्रम शासनाच्यावतीने राबविण्यात येत आहे. तरी या योजनेचा संपूर्ण राज्यातील व जिल्हयातील सर्व माता भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
या अभियानाअंतर्गत मंगळवारी शहरातील 11 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांतर्गत आयोजित केलेल्या शिबीरामध्ये 18 वर्षावरील महिला-331, गर्भधारणापूर्व सेवा व कार्यक्रम-45, गरोदर माता-93, असंसर्गजन्य आजार-106 इतक्या महिलांना वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत आरोग्य तपासणी करुन त्यांना आवश्यकतेनुसार औषधे व समुपदेशन केले.
यावेळी उपायुक्त रविकांत आडसूळ, सहा.आयुक्त संदिप घार्गे, आरोग्याधिकारी डॉ.रमेश जाधव, आरसीएच नोडल ऑफिसर डॉ.अमोलकुमार माने, प्रशायकी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश पावरा, डॉ.विद्या काळे, डॉ.रती अभिवंत, वैद्यकिय अधिकारी डॉ.रुक्सार मोमीन, सावित्रीबाई फुले, महाडिक माळ व पंचगंगा रुग्णालयाकडील सर्व स्टाफ उपस्थित होता.
सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे गरोदर मातासाठी दि.27, 29 सप्टेंबर व 3 ऑक्टोंबर 2022 रोजी सोनोग्राफी शिबिराचे नियोजिन करण्यात आले आहे. त्याचबरोबर बुधवार, दिनांक 28 सप्टेंबर 2022 पासून दिनांक 5 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत 18 वर्षावरील शहरातील महिला, माता व गरोदर स्त्रिया यांनी माता सुरक्षित तर घर सुरक्षित याअभियानाअतंर्गत आरोग्य तपासणीकरीता नजीकच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात जाऊन आरोग्य सेवेचा लाभ असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.