इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहरातील रेशन अनेक लोकांना एप्रिल व मे २०२२ चे नियमीत व मोफत मिळणारे धान्य मिळालेले नाही. त्यामुळे हजारो कुटुंबाना उपासमारी सहन करावी लागत आहे. बऱ्याच दुकानाकडे गहू आलेला आहे मात्र त्याचे वाटप केलेले नाही. मात्र गहू आलाच नाही असे लोकांना सांगितले जाते. दुकानामध्ये गहू आणि तांदूळ उपलब्ध करून त्याचे वाटप न झाल्यास इचलकरंजी पुरवठा कार्यालयाच्या दारात ठिय्या आंदोलनाचा इशारा भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीवे देण्यात आला आहे.
पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या महिन्याचे धान्य वेळेवर का आले नाही व त्याला जबाबदार असणाऱ्यांवर तसेच गेल्या महिन्यातील मोफतचा गह आला, मात्र तो वाटला नाही त्यांचेवर कोणती कारवाई करणार तसेच तांदुळ आला नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले या गोष्टीला जबाबदार असणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे तसेच इचलकरंजी येथे एप्रिल महिन्याचा आलेला तांदूळ खराब असल्याचे समजल्यावर जो तांदूळ सिल केला तो कशामुळे खराब झाला व त्याला जबाबदार असणाऱ्यांवर कोणती कारवाई करणार तसेच रेशनवर मिळणाऱ्या तांदूळ व गहू यांचे प्रमाणात बदल केला आहे. गव्हाचे प्रमाण जास्त पाहिजे, मात्र गव्हाच्या प्रमाणात कपात केली जात आहे. नवीन तांदळामध्ये कणी मिसळून तो जुना असल्याचे भासवले जात असून ही रेशनवरील ग्राहकांची शुध्द फसवणूक आहे. अशा भ्रष्ट अधिकारी व कंपनीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. १ तारखेला रेशनवरील ग्राहकांना अन्नधान्य मिळाले पाहिजे, हा अधिकार असताना आपण कामात हयगय केल्याने लाखो लोकांना अन्नापासून वंचित ठेवण्याचे आपले धोरण चुकीचे आहे. आपल्या चुकीच्या कार्यपध्दती मुळे लोकांना उपाशी रहावे लागले आहे. आपण लोकांची छळणूक करीत आहात. आपण लोकांची सेवा करण्याऐवजी त्यांना उपाशी ठेवण्याचे पाप करीत आहात.
निवेदनावर भरमा कांबळे, शिवगोंड खोत, आनंदराव चव्हाण, अंबादास कुणीगिरी, वळकुडे, दत्ता माने यांच्या सह्या आहेत.